Powered By Blogger

24 August, 2014

गेल्या अनेक दिवसांपासून अजिबात पाऊस पडलेला नसल्यामुळे शेतातील पिके कोमेजू लागली आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे . पोळा सन एरवी अतिशय उत्साहात साजरा केला जातो परंतु या वेळेस आपल्या भागातील पोळा निरुत्साहात साजरा होईल असे चित्र दिसते. दोन वेळेस पेरणी करूनही पिक हाती लागते कि नाही अशी परिस्थिती आहे.
एकीकडे हे दृश्य असतानाच वर्तमानपत्रात बातमी वाचली सलमान खान चा नुकताच प्रकाशित झालेला सिनेमा " किक " ने अल्पावधीत ३७५ कोटी रुपयांचा business केला .  आणि हे celebrate करण्यासाठी kick आणण्यासाठी सिनेजगतात पार्ट्या झोडल्या जात आहेत. किती मोठी विसंगती आणि किती मोठी आर्थिक विषमतेची दरी आहे आपल्या समाजात ?
वाटले होते कि या वर्षीही आपले येलदरी धारण भरेल आणि येणारी २ वर्षे शेतकरी ओलिताखालील पिके घेवून आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल पण कसले काय ?
आपला शेतकरी शेवटी कर्जातच जगतो,कर्जातच मरतो हेच विदारक सत्य आपण अनुभवतो .

09 August, 2014

अनपेक्षितपणे मिळालेले खासदारपद आणि समाजसेवेची जाणीव !

भारतरत्न " सचिन रमेश तेंडूलकर आणि सिनेक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व रेखा या दोघानाही तत्कालीन सरकारने खासदारपद देवून त्यांच्या कारकीर्दीचा गौरव केला. इथपर्यंत ठीक आहे कि देशासाठी त्यांनी बाजी पणाला लावून आपापल्या क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली म्हणून त्यांचा बहुमान सरकारने केला.
सचिनने क्रिकेट पासून सन्यास घेतला त्यामुळे असे वाटले कि खासदारपद मिळाल्यानंतर  त्यांच्याकडून समाजाला खूप चांगली सेवा मिळेल आणि संसदेत उपस्थित होणार्या अनेक प्रश्नांवर होणार्या चर्चेत सहभागी होवून ते आपले मौलिक विचार मांडून अनेक समाजोपयोगी योजना राबवतील तसेच विशेषत: क्रीडा क्षेत्रात असलेल्या अनेक त्रुटी आणि कमतरता यांचा देखील त्यांच्याकडून योग्य असा पाठपुरावा होईल पण हा आपला म्हणजेच सर्व समाजाचा भ्रम ठरला कारण त्यांनी लोकसभेत हजेरीच लावली नाही तर कामकाज काय करणार ? हीच गोष्ट रेखाच्या बाबतीत सुद्धा ! लोकसभेतील एकूण कामकाजाच्या तासांपैकी ठराविक तासांची उपस्थिती सक्तीची असावयास हवी आणि कदाचित असेलही पण हे लोक celebrity असल्यामुळे त्यांच्यासाठी माफ असेल. " भारतरत्न "हे सर्वोच्चपद बहाल केल्यानंतर लोकसभेचे सदस्यपद देण्याची काहीच गरज नव्हती .
प्रकाश आमटे,अन्ना हजारे,यांच्यासारखे नि:स्वार्थी भावनेतून आणि कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नसलेले अनेक समाजसेवक खासदार पदासाठी योग्य राहिले असते पण सत्तेपुढे शहाणपण …… चालत नसते हेच खरे !
अजूनही वेळ गेलेली नाही या दोघांचेही लोकसभा सदस्यपद काढून घेण्यात यावे आणि जनमत विचारात घेवून या दोन जागा भरण्यात याव्यात असे वाटते .
                                          महादेव विश्वनाथ कापुसकरी
                                          बसमत नगर जि. हिंगोली .

02 August, 2014

व्यथा बळीराजाच्या ………… !

आज आपल्या देशातील एकूण लोकसंख्ये पैकी ६० ते ७० टक्के लोक प्रामुख्याने ग्रामीण भागात राहतात. आणि यांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे पारंपारिक शेती . म्हणूनच भारत देश हा शेतीप्रधान आहे असे आपण म्हनतो.
देशाचा विकास हि संकल्पना दृष्टीक्शेपात ठेवून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने  या घटकाचा पूर्णपणे विकास झाला किंबहुना हा घटक संपूर्णपणे सुखी झाला तरच देशाचा विकास होत आहे असे समजले तर ते वावगे ठरणार नाहि.
स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच शेतकरी हा तसे पाहिले तर अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे .याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जर आपण मुळापर्यंत जाण्याचे ठरविले तर असे लक्षात येते कि शेतकर्याच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही मात्र त्याला शेतीमध्ये उत्पादन काढण्यासाठी लागणार्या सर्व खर्चामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे सर्व समीकरणच पूर्णत: कोलमडून गेलेले आहे.
कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेतून विचार केला तर देशाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी खर्चाची जी तरतूद आहे त्याचा सर्वंकष अभ्यास करून त्यात वाढ करणे गरजेचे आहे.
सिंचनाच्या आधुनिक सुविधा,अत्याधुनिक यंत्रसामुग्री,संशोधित आणि रोगप्रतिकारक बी-बियाणे,चांगल्या प्रतीची खते आणि pesticides,तज्ञ अधिकार्यांचे योग्य मार्गदर्शन,वेळोवेळी पर्यावरणात होणार्या बदलांची इत्यंभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था होणे एवढेच नव्हे तर पाण्याचा कमीतकमी अपव्यय या सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर होणे अत्यंत आवश्यक आहे.
या सर्व बाबिंसोबतच शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे हि सर्वात मोठी गरज आहे. कारण त्याशिवाय शेतकरी कधीच सुखी होवू शकत नाहि.
हे तपासण्यासाठी शासनाने वाटल्यास कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा एक आयोग नेमावा आणि त्यांच्या शिफारशिप्रमाने योग्य तो निर्णय घ्यावा.
आज आपण पाहतो सर्व शासकीय कर्मचार्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेत असताना पहिला वेतन आयोग,दुसरा वेतन आयोग,तिसरा ,चौथा,पाचवा,सहावा अश्या प्रकारचे आयोग स्थापन केले जातात आणि सर्व शासकीय कर्मचार्यांच्या पगारीचे वेळोवेळी सुधारीकरण करून त्यांच्या राहणीमानात काळाप्रमाणे कशी सुधारणा केली जाते तसे या दुर्लक्षित शेतकर्याला का नको? या शेतकर्याने आपल्या शेतात काहीच पिकवायचे नाही असे ठरविले तर अख्खा देश उपाशी मरू शकतो या वास्तवाची जाणीव संबंधिताना होणे आज आवश्यक आहे.
लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका येणार आहेत . सर्व शेतकऱ्यांनी देखील आपल्या वर उल्लेख केलेल्या सर्व अडचणींचा आढावा नेत्यांपुढे मांडावा आणि त्यंच्या उत्पनाचा आलेख वरून खाली कसा येत आहे आणि खर्चाची बाजू कशी वर वर जात आहे दाखवून द्यावे पण सर्वांनी संघटीत होणे हि काळाची गरज आहे.
                                                     महादेव विश्वनाथ कापुसकरी .
                                                     बसमतनगर जि. हिंगोली .
                                                     मो. ९४२३१४१००८  

03 June, 2013

करिअर मार्गदर्शनाची गरज

नुकतेच बारावी चे निकाल जाहीर झाले आणि दहावी चे सुद्धा लवकरच होणार आहेत असे प्रसिद्ध झाले आहे. दहावी नंतर आणि बारावी नंतर विद्यार्थ्याना कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत? आणि किती टक्के मार्क्स च्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कोर्सेस साठी प्रयत्न करावेत यासाठी त्याना मार्गदर्शन तज्ञ लोकांकडून विस्तृत प्रमाणात दूरदर्शन वरून होणे गरजेचे आहे कारण आजचे सर्वच पालक हे याबाबतची पूर्ण माहिती असणारे नसतात आणि विशेषत: ग्रामीण भागातील पालक हे तर नवीन नवीन निघालेल्या अनेक व्यावसायिक कोर्सेस बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतात. या सर्वाना योग्य मार्गार्षानाची नक्कीच गरज असते. परंतु आज आपण पहात आहोत कि जवळपास सर्व वाहिन्या वर IPL चे फिक्सिंग,श्रीनिवासन चा राजीनामा ,दालमियाची नियुक्ती,शरद पवारांची मानहानी ,अनेकांनी व्यक्त केलेली याबाबतची मते,,इत्यादी इत्यादी वर चर्चा आणि बातम्या देण्याची मोठ्या प्रमाणावर चढाओढ लागलेली आहे असे चित्र दिसते. वास्तविक क्रिकेट ला किती महत्व द्यावे हे ठरविण्याची आज वेळ आली आहे. क्रिकेट पेक्षा आपल्या शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणार्या युवकाला आणि देशाच्या भावी आधार स्तंभाला पूर्ण आणि सविस्तर मार्गदर्शनाची गरज असून आजचे गब्बर शिक्षण सम्राट हे जबर फी आकारून या तरुणांना पद्धतशीरपणे फसवणूक करतात आणि बिचारे पालक इकडून तिकडून मोठ्या कष्टाने जमविलेले सर्व पैसे या निगरगट्ट झालेल्या  संस्था चालकांच्या घशात घालून मोकळे होतात. पण सर्व सविस्तर माहिती घेवून जर प्रवेश घेण्याचे ठरविले तर नक्कीच या सर्व गैर्प्रकाराना आळा  बसू शकतो. त्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी या दोघांनीही घाई न करता शांतपणे सर्व माहिती घेवूनच पुढचे पाउल उचलावे आणि होणारी फसवणूक टाळावी .
                                                        महादेव विश्वनाथ कापुसकरी

25 May, 2013

क्रिकेट मधील फिक्सिंग आणि प्रेक्षक

I P L ची फिक्सिंग नुकतीच उजेडात आलेली आपण म्हणजेच सर्व क्रिकेट प्रेमींनी वर्तमान पत्रातून आणि दूरदर्शन वर पहिलीच असेल. किती हे पैशासाठी नैतिक अध:पतन म्हणायचे ?
आपण प्रत्यक्ष तिकीट काढून सामना पाहणारे प्रेक्षक आणि दूरदर्शन वर सामना पाहणारे जगाच्या पाठीवरील करोडो प्रेक्षक या सर्वांची कीव करावीशी वाटते कारण किती आत्मियतेने आणि उत्कंठा पूर्वक आपण दुसरी अनेक कामे सोडून सामना पाहतो आणि हे हरामखोर खेळाडू आपले इमान पैशासाठी विकून आपल्याला सरळ सरळ उल्लू बनवतात !
सर्व प्रेक्षकांनी उच्च न्यायालयात I P L सामन्यांचे खेळाडू,आयोजक,टीम चे मालक आणि या सर्वाना परवानगी देणारे शासन या सर्वांवर फसवणुकीची याचिका दाखल करावी आणि सर्व प्रेक्षकांचा अत्यंत असा बहुमुल्य वेळ वाया घालविल्याबद्दल आणि फिक्सिंग उघडकीला आल्यावर झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मोठी किमत वसूल करण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी कायदा तज्ञांची सल्लामसलत करावी असे वाटते आणि यापुढे होणार्या सामन्यांवर स्टे मिळण्यासाठी सुद्धा दुसरा खटला दाखल करावा कारण कशावरून पुढील सामान्यामाद्धे फिक्सिंग होणार नाही ?
या सर्व सामन्यातील गुंतलेले सर्व लोक करोडो रुपयांची माया अगदी सहजतेने गोळा करत आहेत आणि बिच्चारे प्रेक्षक केवळ हात चोळत बसलेत अगदी हतबल होवून ! जागे व्हा क्रिकेट रसिकानो ,जागे व्हा आणि काही तरी करा या धनदांडग्या आणि  क्रिकेट च्या दुकानदारांविरुद्ध !
आपण जेव्हा पाहत आहोत कि BCCI चे अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई मय्यप्पन हे स्वत: या फिक्सिंग मद्धे गुंतलेले आहेत आणि तपास जसाजसा पुढे सरकत आहे तसेतसे नवीन मोठे मोठे मासे दररोज गळाला लागत आहे आणि हि लिंक  टीम च्या मालकांपर्यंत  पोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे असतानाही जर प्रेक्षक सामने पाहण्याची हौस करीत असतील तर या सर्व फिक्सिंग ला पर्यायाने मोठ्या भ्रष्टाचाराला प्रेक्षकांची मूक समती आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाहि. कारण दररोज उघडकीस येणारे घोटाळे,अनेक भ्रष्टाचारांची प्रकरने हे फारच अंगवळणी पडल्यामुळे कि काय कोणालाच काही गांभीर्य वाटेनासे झाले आहे . मात्र एक मात्र खरे आहे कि क्रिकेट च्या सर्व प्रेक्षकांनी सामनाच पहायचा नाही असे जर ठरविले तर मात्र या सर्व बड्या धेंडांची एका क्षणात गोची होवू शकते हे काळ्या दगडावरची रेघ आहे. एक वेळ सर्व प्रेक्षकांनी हा प्रयोग करून पहावाच असे मनापासून वाटते.
                                                 महादेव विश्वनाथ कापुसकरी
                              
                   एक क्रिकेटप्रेमी

Cricket troll - Match fixing

Cricket troll - Match fixing

30 March, 2013

संजय दत्त यांच्या शिक्षेत माफी देणे योग्य कि अयोग्य ?

सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्त याला पाच वर्षे शिक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि इकडे सर्व चित्रपट सृष्टी आणि संजय दत्त शी संबंध असलेले सर्व लोक बेचैन झाले . आणि लगेच या शिक्षे ला राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात माफी द्यावी अशी चर्चा संजय च्या निकटवर्तीयांकडून सुरु झालि. आणि त्यासाठी लॉबिंग साठी प्रसार माध्यमांचा वापर चालू होवून भट्टी गरम झाल्यावर जशी आपापली पोळी भाजून घेतली जाते तसे सर्वांचे प्रयत्न सुरु झाले आणि प्रत्येक प्रसार मध्यम वाले आपली बातमी कशी भडक होईल याची खबरदारी घेवून आपापले कवरेज कसे प्रक्षोभक होईल याची व्यवस्था करण्यात मग्न झाले . पण एक गोष्ट कोणीही लक्षात घेत नव्हते कि असे करणे कितपत योग्य आहे ?
न्यायमूर्ती काटजू यांनी तर अगदी कहर केला आणि राज्यपालाना पत्र लिहिले सुद्धा !
तसे पाहिले तर काटजू याना कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात आ बैल मुझे मार असे अंगावर ओढवून घेण्याची त्यांची modus operandi आहे असे दिसते.
अमरसिंग, जया बच्चन ,इत्यादी प्रभृतीनी तर राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेवून संजय यांच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला माफी द्यावी अशी मागणी केलि. भारतीय संविधानातील उपलब्ध असलेल्या आणि संजय दत्त याने केलेल्या गुन्ह्यांसाठी प्रचलित कायद्याच्या सर्व प्रावाधाना प्रमाणेच सर्व गोष्टींचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करूनच हि शिक्षा दिली गेली आणि या शिक्षेचा सर्वांनी अतिशय आदरपूर्वक स्वीकार करावा हे या सर्व मंडळीकडून अपेक्षित आहे. आणि जर माफी दिली गेली तर हा अतिशय चुकीचा पायंडा पडेल हि गोष्ट सर्वांकडून दुर्लक्षिली जात आहे असे दिसते. अश्या प्रकारे गुन्हेगारांना  जर राज्यपाल माफी देव लागले तर न्यायालयाचे महत्व काय राहिले ?
वकिलांनी सरळ राज्यापालाकडेच केस चालवावी आणि त्यांनीच निकाल द्यावा .
दुसरीकडे स्वत: संजय दत्त असे म्हणतो कि हि शिक्षा मला मान्य आहे आणि मी साडेतीन वर्षे जेल मद्धे राहण्यास तयार आहे मग इतर लोकांनी काय म्हणून हि नाटके करावीत ?
आणि या गोष्टीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही कि १९९३ च्या दंगलीत २५७ निष्पाप लोकांचे प्राण गेले होते. जर जया बच्चन किंवा काटजू तसेच अमरसिंग यांच्या कुटुंबियातील कोणी सदस्य या दुर्दैवी मृतामद्धे असला असता तर अश्या परीस्थित सुद्धा या लोकांची हीच भूमिका राहिली असती काय ?​

16 March, 2013

धुलीवंदन

                                                                      आज   महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सर्व जनता विशेष करून शेतकरी वर्ग दुष्काळाच्या असह्य  झळाच्या विळख्यात असून त्याचा मुकाबला कसाबसा करीत आपले जीवन जगत आहेत. शासनाकडून त्यांच्या या वेदना काही प्रमाणात तरी कमी होतील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न शासन  करीत आहे.
पण कितीही प्रयत्न झाले तरीही शेवटी आकाशाला थोडीच गवसणी घालू शकणार ?
1972 पेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे असे सांगितले जात आहे. अनेक जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे फार मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे आणि एवढेच नव्हे तर जनावराना देखील पिण्यासाठी पाणी आणि चारा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी स्थलांतर करून जिथे पाणी आहे अश्या ठिकाणी जात आहेत.
औरंगाबाद येथे पाण्याची अत्यंत कमतरता असताना देखील तेथील बियर च्या कंपन्याना मात्र पाण्याचा कोटा वाढवून मिळाल्याचे दूरदर्शन च्या z चोवीस  तास या वाहिनीने आकडेवारी सहित दाखविले आणि विशेष म्हणजे त्यांच्या उत्पादनात अजिबात घट होणार नाही हि काळजी घेतली जाते हे पाहून मनाला वेदना झाल्या.
अजून तर मार्च चे पंधरा दिवस ,एप्रिल चा पूर्ण महिना ,मे चा पूर्ण महिना आणि जून चे पंधरा दिवस असे एकूण तीन महिने या खडतर प्रवासातून जाणे बाकी आहे व हा प्रवास प्रत्येक दिवसागणिक अधिक अधिक खडतर होत जाणार आहे यात काहीच शंका नाहि.
ज्याना जशी मदत करता येईल तशी प्रत्येकाने दुष्काळग्रस्त पिडीताना मदत करावी आणि प्रत्येकाने पाण्याचा वापर खूप जपून करावा कारण यापुढे हि पाणी वरचेवर कमीच होत जाणार असे संकेत भूगर्भ अभ्यासक देत आहेत.
27 मार्च रोजी धुलीवंदन हा सन येत आहे. तरुणाई साठी हा सन म्हणजे रंग खेळून आनंद घेण्याची जणू पर्वणीच असते. मात्र गेल्या काही वर्शामद्धे धुलिवन्दना च्या सणाला काहीसे विकृत स्वरूप येत आहे किंबहुना असे स्वरूप आणणे हि एक प्रकारची फ्याशन बनत चालली आहे. याला कारण म्हणजे या दिवशी होणारा दारू चा वापर.
तरुण मुले आणि मध्यम वयाचे नागरिक सुद्धा या दिवशी दारू,भंग,आणि नशा आणणारे तत्सम जे काही प्रकार असतात आशाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात आणि अतिशय अश्लील भाषेत रस्त्याने मोठ्या आवाजात शिवीगाळ करतात आणि घोषणा देत फ़िरतात. यात अनेक प्रतिष्ठित हि सामील होताना दिसतात आणि आपण काय करतो आहोत याची कुणालाही काहीच लाज वाटत नाही कारण हे सर्व जन असे समजतात कि हा सन म्हणजे अश्या प्रकारच्या कार्या साठी हक्काचा दिवस आहे.
हे सर्व बंद झाले पाहिजे आणि त्यासाठी समाजातील जो काही बुद्धिवादी वर्ग आहे त्यांनी शासनाची तसेच सर्व पक्षातील राजकीय नेत्यांची मदत घेवून आनि तरुण मुलांपैकी जी काही शिक्षित आणि समजदार आहेत अशा सर्वांची एक बैठक घेवून काही तरी विधायक कामामद्धे हा दिवस घालविण्यासाठी प्रयत्न केल्यास काही तरी बदल होवू शकेल.
एकीकडे दुष्काळा मुळे  पाण्याचा अत्यंत तुटवडा आणि जर दुसरीकडे आपण रंग उधळण्यासाठी पाणी वापरणे हे कितपत योग्य आहे हे सद्सद्विवेक बुद्धीने ज्याचे त्याने ठरवावे.

                                                                    महादेव विश्वनाथ कापुसकरी
                                                         बसमत नगर जि. हिंगोली
                                                         मो. 9423141008.  

01 March, 2013

आपला शेतकरी

शेतकर्या च्या मुलभूत प्रश्नाबाबत आणि त्यांच्या अडचणी बाबत लिहिणारे आणि बोलणारे खूप नेते आहेत  पण आजपर्यंत सर्व सामान्य शेतकरी या वर्गाला कुणीच वाली नाही हे दुसरे सत्य आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव जो पर्यंत शेतकर्याला मिळत नाही तो पर्यंत या शेतकर्याला कोणी सुखी पाहू शकणार नाहि.
आज आपण पाहतो कि साध्या टाचणी पासून ,टूथ पेस्ट ,खिळे ,नट बोल्ट ,इत्यादि इत्यादी वस्तू पासून मोठया उत्पादनाकडे पहा प्रत्येकाला आपण उत्पादित केलेल्या वस्तूचे उत्पादन खर्च लावून त्यांवर आपला नफा लावून आणि त्या वस्तूंवर किमत सुद्धा छापण्याची मुभा आहे त्यामुळे सर्वाना त्यांचा नफा निश्चित मिळण्याची हमी आहे. पण जगाच्या पाठीवर केवळ भारतीय शेतकरी हा एकच घटक असा आहे कि याने वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस राब राब राबायचे आणि कष्टातून मिळालेल्या उत्पादनाचा भाव मात्र ठरविण्याचा हक्क यां दुर्दैवी घटकाला मुळीच नाहि. हा काय न्याय आहे ?
अनेकाना शेतकर्याबद्दल सहानुभूती आहे ,अनेक जन त्यावर लिहितात सुद्धा. पण न्याय देण्यासाठी ठोस कार्य करणारे कोणीच नाहि ?
मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या सर्व वेदना ,व्यथा मी समजू शकतो आणि स्वत: सुद्धा अनुभवतो. पण करणार काय ?
कधी कधी मनाचा खूप उद्वेग होतो ,मन संवेदनशील असल्यामुळे मनाला या गोष्टींमुळे वेदना होतात पण या निगरगट्ट आणि भ्रष्टाचाराणे बरबटलेल्या राजकीय नेत्यांना शेतकर्या साठी दयेचा पाझर कधी फुटेल हे आपण कसे सांगू शकणार ?

25 September, 2012

सार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप : काल आणि आज

लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी १८९३ मद्धे गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देवून त्याचे पुनुरुज्जीवन केले .यापूर्वी गणेशोत्सव हे घरोघर खाजगी रुपात होत असत मात्र टिळकांनी त्याला १० दिवसांचे सार्वजनिक स्वरूप दिले.त्यामागे त्यांचे दोन उद्देश होते.एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटीश विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे समस्त हिंदू समाज एकत्र येवून त्यांच्यातील एकोपा वाढावा आणि एकमेकांच्या विचारांची देवान घेवाण व्हावी.त्यानिमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात व्याख्यानमाला आयोजित करून समाजात एका नवीन दिशा दर्शक उपक्रमाची सुरुवात केली.
परंतु जसजसा काल बदलत गेला तसे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत गेले आणि विशेषत: युवावर्ग या उत्सवात मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आणि या उत्सवातील व्याख्यानमाला आणि कौटुंबिक नाटके इत्यादी प्रकार मागे पडून त्याजागी चित्रपटातील भडक स्वरूपातील गाण्यावर नाच करणे ,दारू पिवून धांगड धिंगा करणे ,गणेश मूर्ती पुढे जुगार खेळणे जमा झालेल्या प्रचंड वर्गणीची उधळपट्टी करणे असे प्रकार चालू झाल्यामुळे अनेक ठिकाणी खरे गणेश भक्त बाजूलाच रहात आहेत.अर्थात ह्या गोष्टी सर्वच ठिकाणी नाहीत ,अनेक ठिकाणी अजूनही चांगले उपक्रम अवश्य घेतले जातात मात्र हे प्रमाण कमी आहें.
मात्र दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की लोकमान्य टिळकांचा एवढा चांगला उदात्त हेतू हा काळाआड जावू पहात आहें आणि या वेगवान आणि संगणकीय युगात नवीन प्रवाह येवू पहात आहेत .
                              
                                                  महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                              
                                                  बसमतनगर जी. हिंगोली.

02 August, 2012

टीम अण्णांचा दुर्दैवी निर्णय

आपण पहात आहोत की गेले  ९-१० दिवस सातत्याने उपोषण करूनही या वेळेस जनतेने ,मिडीया ने आणि सरकारने सुद्धा याची फारशी दाखल घेतली नाही आणि हे उपोषण केवळ निश्क्रीयच नव्हे तर सर्वांसाठी एक देखावाच ठरले अर्थात या उपोशनातील काही मागण्या जरी महत्वपूर्ण वाटत असल्या तरीही केवळ टीम अण्णा नेच या साठी पाठपुरावा करावा आणि इतर सर्व जनतेने केवळ तमाशा बघावा हे कोणत्याही सुज्ञ नागरिकास नक्कीच रुचणारे नाही त्यासाठी देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळावयास हवा जो की मिळाला नाही आणि मिळणारही नाही कारण आज च्या वेगवान जीवनात या प्रश्नावर विचार करायला कोणाला वेळ आहें ? आणि किती टक्के बुद्धीजीवी लोक या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करतात याचा जर सर्वे केला तर नक्कीच निराशाजनक आकडेवारी हाती येयील.मात्र एक गोष्ट नक्कीच खटकण्यासारखी आहें ती म्हणजे अण्णांचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय ! सध्याच्या जमान्यात निवडणुकीत यशस्वी होणे हे अन्नासार्ख्या व्यक्तीला किंवा त्यांनी काढलेल्या पक्षाला शक्य होईल असे मुळीच वाटत नाही.कारण आज आपण पाहतो निवडणुकीत ज्या मार्गांचा वापर केला जातो त्या मार्गाने टीम अण्णा चे सहकारी जावूच शकत नाहीत कारण तो मार्ग अनैतिक आहें आणि निवडणूक तर केवळ नैतिक मार्गाने आणि प्रामाणिकपणे जिंकली जाउच शकत नाही हे एक निर्विवाद सत्य आहें असे वाटते.जेष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांनी मात्र अण्णाना एक चांगला सल्ला दिला आहें की नवीन पक्ष स्थापनेपूर्वी हजार वेळा विचार करा हा अतिशय समर्पक वाटतो अण्णांनी जरूर विचार करावा आणि जेवढा तमाशा झाला तिथेच संपवावा असे प्रामाणिकपणे वाटते.

19 June, 2012

अमीर ला राज्यसभेचे खास आमंत्रण

राज्यसभेत भाषण देण्यासाठी अमीर खान ला आमंत्रण देण्यात आले हि खरोखरच एक आनंदाची आणि चांगली बातमी आहें.परंतु त्याचबरोबर एका गोष्टीचे अत्यंत वैषम्य वाटते की वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार राज्यसभेत उघडकीस आणण्यासाठी एका चित्रपट कलावंताला पाचारण करावे लागते हि गोष्ट कुठेतरी मनाला वेदना देते.कारण की आपले राज्यसभेचे एकूण सदस्य आणि लोकसभेचे एकूण सदस्य या पैकी एकही सदस्य ह्या गैरप्रकाराचा सखोल अभ्यास करून त्यावर भाषण देवू शकत नाही काय ?
किंवा लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे सभापती स्वत: ह्या विषयावर विशेष अभ्यास करून या क्षेत्रातील सर्व गैरप्रकार उघडकीस आणू शकले असते तर भारतीय संसदेचा आदर सामान्य नागरिकांच्या मनात नक्कीच दुणावला असता असे वाटते.
सत्यमेव जयते द्वारे आजपर्यंत अमीर खान ने जे काही विषय मांडले आणि त्यातील गैरप्रकार जनतेसमोर आणले त्याला खरोखर तोड नाही.अमीर हा खरोखर अमीर ( श्रीमंत ) आहें केवळ नावाने नव्हे तर विचाराने सुद्धा ! या अमीरचे हार्दिक अभिनंदन आणि त्याला सलाम !

10 June, 2012

गुटका आणि तंबाखू बंदी : एक स्तुत्य निर्णय

उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेबांनी काल घोषणा केली की राज्यात गुटका आणि तंबाखू वर बंदी घालण्यात येईल.अतिशय स्वागतार्ह बाब म्हणून सर्वांनी या घोषणेचे स्वागत केले पाहिजे आणि लवकरात लवकर गुटका आणि तंबाखू या दोन गोष्टी महाराष्ट्र राज्यातून पार नाहीश्या झाल्या पाहिजेत.या अगोदरही बरेच वेळा अशी घोषणा झाली परंतु हवेतच विरघळली असे यावेळी होता कामा नये.मंत्रिमंडळात निर्णय घेताना कायद्यातील सर्व तृटींचा नीटपणे अभ्यास करून आणि कुठेही पळवाट न ठेवता हा ठराव घेण्यात यावा कारण मागच्या वेळेस या धनदांडग्या गुटका उत्पादकांनी अशा तृटींचा फायदा घेवून कोर्टां कडून या निर्णयावर स्थगिती मिळविली होती आणि जाहीर केलेली गुटका बंदी शासनाला निमुटपणे मागे घेण्यास भाग पाडले होते.
अशी बंदी घालून तोंडघशी पडण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालून हा विषयच संपविणे शक्य होत नाही काय ?

21 May, 2012

सत्यमेव जयते !

अमीर खान यांनी सुरु केलेले सत्यमेव जयते हे सिरीयल पाहिल्यानंतर ज्याला मन आहें त्याचे डोळे पानावल्याखेरीज राहू शकत नाहीत .आजपर्यंत जे तीन एपिसोड चे विषय त्यांनी निवडले आहेत ते तीनही विषय अतिशय ज्वलंत आणि सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत .टायटल साँग पासून ते बैठकीची ठेवण ,रंगसंगती ,बोलण्याची विशेष ढब,आणि नेमके थीम दाखविण्याची पद्धत इ.सर्व गोष्टी फारच समर्थपणे आणि परिणामकारक रीत्या पेलल्या आहेत ज्याची तारीफ केली तेवढी कमी आहें.
ह्या सिरीयल सारखे यश अशा प्रकारच्या कोणत्याही सिरीयलला इतक्या अल्पावधीत कधी मिळाले नाही.
जिकडे तिकडे फेसबुक वर,वर्तमान पत्रान्मद्धे ,नियत कालीकान्मद्धे सर्व ठिकाणी चर्चा सत्यमेव जयते चीच.
आणि या विषयांवर एवढे सारे पाहिल्यानंतर समाजात जे काही चांगले  घटक आहेत की ज्यांनी थोडेसे कष्ट घेतले तर हे सारे चित्र बदलू शकते.आणि २०-२५ % जरी बदल झाला आणि काही लोकांचे मतपरिवर्तन होवून वाईट प्रथाणा जर फाटा मिळाला तर फार मोठे यश या कार्यक्रमाला मिळाले असे सिद्ध होईल.हा कार्यक्रम तयार करण्यासाठी  फार मोठे परिश्रम घेतलेले दिसत आहेत.आज ज्यांचेकडे लग्नाची मुले किंवा मुली आहेत त्यांनी तर हा कार्यक्रम पाहणे फार गरजेचे आहें.विशेषता: मुलींच्या पालकांनी जर असे हुन्ड्याचे मागणीचे प्रकार किंवा मुलीला त्रास देण्याचे प्रकार होत असतील तर या गोष्टी कश्या प्रकारे हाताळायच्या यातून शिकता येईल.
अमीर खान आणि Reliance foundation यांचे श्रेय फार मोठे आहें यात कोणताही वादच नाही.
भारत देश हा क्रशिप्रधान आहें आणि देशातील जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या या व्यवसायावर अवलंबून आहेत.मात्र त्यांच्या व्यथा या सिरीयल वाल्यांनी परिणामकारक पद्धतीने जर जगापुढे मांडला तर फार बरे होईल.
शेतकर्यांचे शोषण समाजातील सर्व घटकाकडून ,शासनाकडून कसे होते याचे जिवंत चित्रण होणे आवश्यक आहें.
पुढे मागे या सिरीयल ने हा विषय घेतला तर या शोशिताना थोडा दिलासा मिळेल.

28 April, 2012

बालपण वाचवा ...( Save Childhood )














सध्या लेक वाचवा अभियान सर्वत्र राबविले जात आहें मात्र बालपण वाचविणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहें .
भारतात बालकामगार कायदा केवळ कागदावरच आहें प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजिबात कुठे दिसत नाही.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात जिथे जिथे जातो तेथे सभोवताल सहज दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला असे दिसेल की प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालकामगार अत्यंत तोकड्या मजुरीच्या मोबदल्यात निर्घ्णपणे राबविले जात असलेले दिसतील .
काय चूक आहें या बिचार्या चिमुकल्यां बालकांची ? त्यांचे हसण्या,बागडण्याचे,खेळण्याचे वय असताना त्याना क्रूरपणे कामावर जुंपले जात आहें .संपूर्ण भारतात या बालकामगारांची संख्या किती आहें याचा शोध घेण्याचे काम हाती घेवून जर प्रामाणिकपणे सर्वे केला तर निश्चितपणे सर्वाना आश्चर्य करण्याची वेळ येईल अशी आकडेवारी समोर येवू शकते.अनेक वर्षांपूर्वी केलेल्या बालकामगार कायद्यात संशोधन करून बालकाना कामावर ठेवणार्या संस्थाना तसेच या बालकांच्या पालकाना सुद्धा दंडित करण्याची तरतूद होणे आवश्यक आहें.
या निरागस बालकाना जेव्हा श्रीमंत कुटुंबातील त्यांच्या वयाची मुले शाळेत जाताना,खेळत असताना,किंवा बागडत असताना पाहून काय वाटत असेल हि कल्पना करवत नाही.
IPL क्रिकेट च्या संयोजकांना या खेळातून करोडो नव्हे तर अब्जो रुपये मिळतात कारण त्याशिवाय एकेका खेळाडू साठी हे लोक बोली लावून करोडो रुपयांना त्याना विकत घेतात आणि तेथे नाचणार्या चीअर गर्ल्स ना सुद्धा लाखो रुपये दिले जातात .
यापेक्षा बालकामगारांकडे लक्ष केंद्रित करून त्या बिचार्या चिमुकल्यांचे हरवलेले बालपण त्याना बहाल करण्यासाठी काही मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य परत आलेले पाहण्यातील आपल्याला मिळणारा आनंद क्रिकेटचा सामना पाहून मिळणार्या आनंदापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असेल.नाही का ?
पहा हि छायाचित्रे आणि आपल्या काळजाचा ठोका कुठे चुकतो का ते तपासा !
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                          बसमतनगर  जी.हिंगोली.
                                                                          मो. 9423141008
                                                                          blog -www.mvkapuskari.blogspot.com

27 April, 2012

राहुल गांधींचा सातारा दौरा

राहुल गांधी यांच्या सातार्याच्या दौर्यामुळे तेथील दुष्काळ एकदम नाहीसा होईल का असा प्रश्न करणेच चुकीचे आहें असे वाटते.कारण प्रत्येकाला हे माहित आहें की अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने भेट दिल्याने तेथील दुष्काळी परिस्थिती बदलू शकत नाही. पण अशी एक व्यक्ती अशा ठिकाणी भेटीला येत आहें हि गोष्ट सुद्धा त्या व्यक्तीचे असामान्यत्व सिद्ध करून जाते.
दुष्काळी भागात स्वत: जावून तेथील पिडीत लोकांच्या वेदना जाणून घेण्याची जाणीव होणे हा संवेदनशीलतेचा भाग आहें जो की प्रत्येक नेत्यामद्धे आढळत नाही.मी व्यक्तिश: राहुल गांधी यांचा आदर करतो कारण काहीतरी वेगळेपण या तरुणात आहें.
मुंबई ला येवून लोकल ने प्रवास करणे,उपनगरातील स्टेशन समोरील ATM मधून पैसे काढणे,मजुरांसोबत काम करणे,एखाद्या गरीब नागरिकाच्या झोपडीत जाऊन रात्रभर खाटेवर झोपून मुक्काम करणे,इत्यादी गोष्टी करणे म्हणजे केवळ स्टंट करण्यासाठी आहेत हे मी मानत नाही .यासाठी एक प्रकारची जिगर लागते आणि ती जिगर गांधी घराण्यातील या तरुनामद्धे निश्चितपणे पुरेपूर आहें .
सातारा येथील दुष्काळ पिडीत लोकांच्या भावना जाणून घेवून त्यांच्यासाठी काय करता येईल अशा भावनेनेच हि भेट असावी .
                                                                         महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                         बसमतनगर जी.हिंगोली
                                                                         मो. 9423141008  

26 April, 2012

सचिन तेंडूलकर ( खासदार )

सचिन चे हार्दिक अभिनंदन !
सचिन सारख्या निस्प्रह,कर्तबगार आणि प्रामाणिक तसेच त्याच्याकडे सोपविलेले काम पूर्ण क्षमतेने करणारया आणि विशेष म्हणजे सर्वांचा लाडका असलेल्या व्यक्तीकडे समाजाची सेवा करण्याची संधी देणार्या पंतप्रधानांच्या कार्यालयास मनापासून सलाम !
इतर कोणी तरी लोक किंवा विनोद कांबळी या त्याच्या मित्रांकडून असे मेसेज येत आहेत की त्याने राजकारणात जाऊ नये पण त्याने का जाऊ नये ?
आज देशाला सचिन सारख्या सच्च्या दिलाने काम करणार्या नेत्यांची खरी गरज आहें .
मला खात्री आहें की भारत रत्न हि पदवी देण्यापेक्षा एक खासदार म्हणून काम करण्याची संधी देणे हे केव्हाही श्रेष्ठ आहें .
सचिनला सुचना देणार्यांच्या यादीत अनेक लोक त्याच्या जवळचे असू शकतात परंतु त्याने कोणाचेही न ऐकता हि चालून आलेली संधी सोडू नये आणि या संधीचे सोने कसे करता येईल याचा सर्वांगाने विचार करावा असे वाटते.

10 April, 2012

जात प्रमाणपत्राची पडताळणी

जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसीलकार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यतापडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते.आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करूनआपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?
ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन.मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणिसुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हियंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?
जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषीआहे असे समजावे काय?
VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेचफैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतातहे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...
प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.
महादेव विश्वनाथ कापुसकरी

26 March, 2012

majha avadta sachinkshan

मला आठवत असलेली सचिन ची अविस्मरणीय खेळी किंवा संस्मरणीय क्षण जर विचारात घ्यावयाचा झाल्यास मला एक प्रसंग आठवतो .सचिन तेव्हा अगदी बाल्यावस्थेतून किशोरवयाकडे नुकतीच वाटचाल करीत होता . आणि भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्यांवर होता.पेशावर  येथे  हा  सामना  होता
आणि  पाउस  पडल्यामुळे  नियोजित  एकदिवसीय  अंतर  राष्ट्रीय  सामना  रद्द  केला  गेला  मात्र  संपूर्ण  stadium प्रेक्षकांनी  तुडुंब  भरल्यामुळे  एक  प्रदर्शनी  सामना  घेण्याचे  ठरले .असा हा प्रदर्शनी सामना सुरु झाला .
जेव्हा सचिन मैदानात उतरला त्यावेळी पाकिस्तानी प्रेक्षक त्याला दुधाची बाटली दाखवून हिनवीत होते .जागतिक दर्जाचा लेग स्पिनर अब्दुल कादिर गोलंदाजीला होता आणि त्याकाळी अब्दुल कादिर चा लेगस्पिन ला फेस करणे भल्या भल्या फलंदाजाना अवघड जात असे आणि फलंदाजांची हि त्रेधातीरपिट पाहताना पाकिस्तानी प्रेक्षक साहजिकच आनंद घेत होते.
सचिन ला चेंडू टाकण्यासाठी अब्दुल कादिर सज्ज झाला आणि इकडे भारतीय प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकला कारण ह्या नावाजलेल्या लेगस्पिनर पुढे आपला सचिन कसा खेळतो हे पाहण्याची जशी उत्सुकता होती तेवढीच मनात भीतीही होती आणि त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानी प्रेक्षकांची गोलंदाजाला मिळणारी चिअरिंग आणि सचिन ला दाखविली जाणारी दुधाची बाटली.
पहिला चेंडू सचिन ने पुढे येवून उचलला आणि सरळ षटकार ठोकला. तसेच दुसरया चेंडूवरही सचिन ने पुढे येवून तसाच षट्कार मारला मग मात्र सचिनला हिणवणारे प्रेक्षक थोडे शांत झाले आणि श्वास रोखून तिसर्या चेंडूची वाट पाहू लागले. तिसरा चेंडू कादिर ने टाकला आणि सचिन ने तो सुद्धा शतकारासाठी उंच हवेत फटकावला मात्र झेल उडाला आणि अजीम हाफिज ला हा झेल घेता आला नाही आणि त्याने जीवदान दिले.
त्यानंतरच्या तीन चेंडूवर सचिनने एक षटकार आणि दोन चौकार फटकावले आणि त्या षटकांत एकूण २७ धावा काढल्या गेल्या.मला वाटते की अब्दुल कादिर हे षटक आयष्यात कधीही विसरू शकणार नाही..क्षणभर धावते वर्णन करणार्या comentator चा हि गळा भरून आला आणि तो काहीच बोलू शकला नाही.
तो क्षण कोणीही विसरू शकला नाही आणि बाटली दाखविणार्या प्रेक्षकाना सचिन ने निरुत्तर केले आणि मला वाटते की आज सचिन चे महाशतक जर त्या बाटली दाखविणार्या प्रेक्षकांनी पाहिले असेल तर त्याला स्वत:ची नक्कीच लाज वाटली असेल की अरे आपण हे काय केले ....
हा सामना बहुतेक १९८९ साली खेळला गेला आणि एका षटकांत सचिन ने अब्दुल कादिर कडून २७ धावा वसूल करून डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले.
धन्य तो सचिन तेंडूलकर....!     

                           
                                                                             महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                              द्वारा सचिन Textiles ,मेन रोड
                                                              बसमतनगर जी. हिंगोली.
                                                              मो. ९४२३१४१००८
                                                              वय -५२ वर्षे
                                                              व्यवसाय-व्यापार.  

18 February, 2012

कृषी मूल्य आयोग

दि. १८-२-२०१२ च्या Agrowon च्या मुखप्रष्ठावर कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री अशोक गुलाटी यांचे एक वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे जे कि सर्व शेतकर्याना अत्यंत नाउमेद करणारे आणि निराश करणारे असे वक्तव्य आहे.देशातील समस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करायला हवा असे एक शेतकरी म्हणून मला वाटते.
" शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देणे अशक्य आहे " असे त्यांचे वक्तव्य आहे.
जगाच्या पाठीवर जवळपास सर्वच देशांमद्धे शेतकरी आहेत.प्रमाण कमी अधिक असू शकते मात्र शेती हा सर्वत्र  व्यवसाय म्हणून केला जातो.पण भारत हा देश जगाच्या पाठीवर असा एकमेव देश असावा कि जेथे शेतकर्यांचे यथेच्छ शोषण केले जाते आणि बिचारे शेतकरी हतबल होवून सारे काही निमुत्माने सहन करतात कारण कि ते संघटीत नाहीत.
मुळात कृषी मूल्य आयोगाची स्थापना हि शेतकर्याना उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव कसे मिळतील आणि अश्या पद्धतीने भाव मिळण्याच्या कामी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून शेतकरी कसा सुखावेल किंवा तो कसा सुस्थितीत येईल व कर्जमुक्त कसा होईल या कामासाठीच केली गेली असली पाहिजे आणि त्या दृष्टीने या आयोगाने प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे अपेक्षित आहे मात्र या कार्या ऐवजी जर कृषी मूल्य आयोगाचे अद्ध्याक्शाच जर असे निराशाजनक वक्तव्य करीत असतील तर आधीच सगळीकडून खचलेला शेतकरी निराश होवून आत्महत्त्या करणार नाही तर कशाच्या आधारावर जगेल ?
गेल्या ४-५ वर्षांपासून प्रत्येक वर्षी वाढत चाललेले रासायनिक खतांचे भाव,दरवर्षी वाढत चाललेले बी-बियाण्यांचे भाव,दरवर्षी बेसुमार वाढत जाणारे मजुरांचे दर आणि दरवर्षी उतरत चाललेले कृषिमालाचे भाव या बाबी चा सर्वंकष विचार केला तर कृषी मूल्य आयोगाने कृषी उत्पादनांची आधारभूत किमत कोणत्या पद्धतीने काढली आहे याचा संब्र्हम वाटतो.या समितीमद्धे प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी (वातानुकुलीत केबिन मद्धे बसून नावाला शेतकरी म्हणविणारे नव्हेत )समाविष्ट केले जातात किंवा नाही आणि जर ते असतील तर आधारभूत मूल्य नक्कीच योग्य निघू शकते .
शेतकरी तोट्यात आहेत हे अशोक गुलाटी हि मान्य करतात.मात्र हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी असे त्यांचे म्हणणे आहे.
माझ्या मते हि सरकारी मदत देण्यापेक्षा अर्थसंकल्पातील शेतीसाठी असलेली आर्थिक तरतूद फार मोठ्या प्रमाणावर वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.जेव्हा देशातील ७०% लोक हे शेतीवर अवलंबून असताना शेतीसाठी शेतीसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद आहे हे सर्व शेतकऱ्यांनी संघटीत होवून अभ्यास करणे गरजेचे आहे .
शेतकर्यांचे नेते राजू शेट्टी ,पाशा पटेल,शरदजी जोशी याना समस्त शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे कि मागे उसाच्या भावासाठी जसे आक्रमक होवून लढा दिला त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर लढा  उभारून या असंघटीत वर्गाला आणि निष्पाप आणि मेहनत करून प्रामाणिकपणे जगणारया बळीराजाला न्याय मिळवून द्यावा.
अर्थशास्त्राचा नियम,मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ इत्यादी गोष्टींशी शेतकर्याला कसलेही देणे घेणे नाही पण जसे इतर कोणत्याही उत्पादनाचे मूल्य ठरविण्याचे अधिकार त्या त्या वस्तूच्या उत्पादकाला असतो तसा अधिकार म्हणजे जेवढा खर्च त्या पिकावर शेवटपर्यंत झालेला आहे त्यावर शेतकर्याचा नफा लावून त्याला त्याचे मूल्य मिळाले पाहिजे.आणि जेव्हा अश्या प्रकारच्या नफ्याच्या शाश्वततेची हमी शेतकर्याला मिळेल तेव्हा हा बळीराजा नव्या जोमाने कृशीतून उत्पन्न काढून दाखवील आणि हा जोम यशस्वी झाल्यास जगात आर्थिक महासत्ता आपण होवून भारतात चालत येईल.आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत या बळीराजाला सुखी झालेले पाहण्यापासून आपण वंचीत  राहू असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
                                                                                                       महादेव विश्वनाथअप्पा कापुसकरी
                                                                                                       बसमतनगर जी.हिंगोली
                                                                                                       मोब.९४२३१४१००८