19 June, 2012

अमीर ला राज्यसभेचे खास आमंत्रण

राज्यसभेत भाषण देण्यासाठी अमीर खान ला आमंत्रण देण्यात आले हि खरोखरच एक आनंदाची आणि चांगली बातमी आहें.परंतु त्याचबरोबर एका गोष्टीचे अत्यंत वैषम्य वाटते की वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार राज्यसभेत उघडकीस आणण्यासाठी एका चित्रपट कलावंताला पाचारण करावे लागते हि गोष्ट कुठेतरी मनाला वेदना देते.कारण की आपले राज्यसभेचे एकूण सदस्य आणि लोकसभेचे एकूण सदस्य या पैकी एकही सदस्य ह्या गैरप्रकाराचा सखोल अभ्यास करून त्यावर भाषण देवू शकत नाही काय ?
किंवा लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे सभापती स्वत: ह्या विषयावर विशेष अभ्यास करून या क्षेत्रातील सर्व गैरप्रकार उघडकीस आणू शकले असते तर भारतीय संसदेचा आदर सामान्य नागरिकांच्या मनात नक्कीच दुणावला असता असे वाटते.
सत्यमेव जयते द्वारे आजपर्यंत अमीर खान ने जे काही विषय मांडले आणि त्यातील गैरप्रकार जनतेसमोर आणले त्याला खरोखर तोड नाही.अमीर हा खरोखर अमीर ( श्रीमंत ) आहें केवळ नावाने नव्हे तर विचाराने सुद्धा ! या अमीरचे हार्दिक अभिनंदन आणि त्याला सलाम !

10 June, 2012

गुटका आणि तंबाखू बंदी : एक स्तुत्य निर्णय

उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेबांनी काल घोषणा केली की राज्यात गुटका आणि तंबाखू वर बंदी घालण्यात येईल.अतिशय स्वागतार्ह बाब म्हणून सर्वांनी या घोषणेचे स्वागत केले पाहिजे आणि लवकरात लवकर गुटका आणि तंबाखू या दोन गोष्टी महाराष्ट्र राज्यातून पार नाहीश्या झाल्या पाहिजेत.या अगोदरही बरेच वेळा अशी घोषणा झाली परंतु हवेतच विरघळली असे यावेळी होता कामा नये.मंत्रिमंडळात निर्णय घेताना कायद्यातील सर्व तृटींचा नीटपणे अभ्यास करून आणि कुठेही पळवाट न ठेवता हा ठराव घेण्यात यावा कारण मागच्या वेळेस या धनदांडग्या गुटका उत्पादकांनी अशा तृटींचा फायदा घेवून कोर्टां कडून या निर्णयावर स्थगिती मिळविली होती आणि जाहीर केलेली गुटका बंदी शासनाला निमुटपणे मागे घेण्यास भाग पाडले होते.
अशी बंदी घालून तोंडघशी पडण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालून हा विषयच संपविणे शक्य होत नाही काय ?